मुंबईत स्वतःच्या हक्काचे छोटे का असेना परंतु एक घर असावे असे प्रत्येक मुंबईकराचे स्वप्न असते. आणि ह्याचाच काही भुरटे चोर फायदा उचलतात. म्हाडाचे घर मिळवून देण्याच्या नावाखाली 19 लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपाखाली अलीकडेच एका दलालाला म्हाडाच्या मुख्यालयात ताब्यात घेण्यात आले. तर घराचे स्वप्न दाखवून 82 लाखांची फसवणूक झाल्याची दुसरी तक्रार दाखल झाली आहे. मागील तीन महिन्यात अशा चार घटना उघडकीस आल्या आहेत. दलालांच्या अटकेमुळे म्हाडाच्या घरांच्या
नावाखाली फसवणूक करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. घर देण्याच्या नावाखाली 82 लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दक्षता व सुरक्षा विभागाकडे दोन दिवसांपूर्वीच आली आहे. या प्रकरणी अजून दलालाला ताब्यात घेतले नसून सुरक्षा विभागाने म्हाडाच्या इमारतीमधील दलालाचे सीसीटीव्ही
फुटेज व तक्रार खेरवाडी पोलिसांकडे दिली आहे.